Breaking News

विद्या समीक्षा केंद्रबाबत महत्वाचे...

 राज्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित


समग्र शिक्षा, स्टार्स प्रकल्प, पी.एम.श्री., प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अशा केंद्र पुरस्कृत योजनांसह राज्य शासनाद्वारा विभागांतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनांचा लाभ सर्व संबधित घटकांना देण्यात येतो. सदर उपक्रमांचा परिणाम अंतिमतः विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रतिबिंबित होणे गरजेचे असते. अशा परिणामांचे मापन परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI), राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य स्तरावरील संपादणूक सर्वेक्षण (SLAS), नियतकालिक चाचण्या यातून केले जाते. सदरील माहिती संकलन व विश्लेषण करण्यास यंत्रणेतील सर्व घटकांचा श्रम व वेळ खर्च होतो.

विद्यार्थी आपली संपादणूक पातळी वाढविण्यासाठी, शिक्षक आपला व्यावसायिक विकास करण्यासाठी व प्रशासन पर्यवेक्षणात सुधारणा करण्यासाठी विविध अध्ययन सामुग्रींचा, प्रशिक्षणांचा व डीजिटल साधनांचा नियमित उपयोग करीत असतात. तथापि, यातील परिणाम देणारे घटक कोणते याचे विश्लेषण माहिती अभावी करता येत नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व मशीन लर्निंगच्या मदतीने माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. प्राप्त माहिती विश्लेषणाच्या आधारे राज्यातील शाळा, केंद्र. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील शैक्षणिक स्वास्थ्याचे अचूक निदान करता यावे, प्रत्येक स्तरावरील गरजांची निश्चिती करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी नेमकेपणाने कृती कार्यक्रमांचे नियोजन, प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण व अचूक मूल्यमापन करता यावे, यासाठी "विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आली आहे.

💁 विद्या समीक्षा केंद्राची उद्दिष्टे :-

● समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण करणे.

● शैक्षणिक व भौतिक उपक्रम / योजनांचा राज्य स्तरावरून मागोवा घेणे आणि क्षेत्रिय अधिकारी व शिक्षक यांचे डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षमीकरण करणे.

● प्रवेशित विद्यार्थी, शालाबाह्य विद्यार्थी, गळती झालेले विद्यार्थी, मुक्त शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट बालकामगार, दिव्यांग विद्यार्थी, व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण, शिष्यवृत्ती, आर्थिक लाभाच्या योजना, शाळास्तरावरील मूल्यमापन, विद्यार्थी व शिक्षक यांना आवश्यक मदत, प्रोत्साहन व पुरस्कार इ. बाबींवर लक्ष ठेवणे.

● विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी व उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे.

● डेटा आधारे तातडीने लक्ष देण्यासाठीची गरजाक्षेत्रे निश्चित करून निर्णय घेण्यासाठी मदत करणे.

● शिक्षण व्यवस्थेस पूरक ठरणाऱ्या सर्व संबंधितास माहिती, जागरुकता आणि मदत करण्यासाठी राज्यस्तरावर मदत कक्ष (Help Desk) तयार करणे.

● सुनिश्चित शाळा मानकांनुसार शाळांची सद्यस्थिती व सुधारात्मक कामगिरीचा Real Time माहिती दर्शविणारा डॅशबोर्ड विकसित करणे.

● राज्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील समन्वय वाढवून त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे.

● राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण करणे.

● समग्र शिक्षा, स्टार्स प्रकल्प, पी.एम.श्री. तसेच शासनाचे विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे वार्षिक कार्ययोजना व अंदाज पत्रक तयार करण्यास व शासन स्तरावर धोरण निश्चितीस मदत करणे.

● शिक्षण व्यवस्थेतील सर्व संस्थांच्या लेखा व वित्त विषयक बाबींचे डॅशबोर्ड विकसित करून संनियंत्रण करणे.

💁 विद्या समीक्षा केंद्राची (VSK) कार्यपध्दती :-

● संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे हे नामांकित संस्थांच्या मदतीने माहिती संकलित व विश्लेषित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकसित करतील.

● सदर यंत्रणा विकसित करण्यासाठी शासनाच्या सरल, शालार्थ, सेवार्थ, यु-डायस पोर्टल व संबधित शासकीय संस्थांकडील डेटाबेसचा उपयोग करण्यात येईल.

● विकसित केलेल्या Chatbot/App/Platform इत्यादीद्वारे शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती, विविध लाभाच्या योजना, प्रशिक्षणे, चाचण्या, शाळाभेटी इत्यादी बाबींची माहिती विद्या समीक्षा केंद्राच्या सर्व्हरवर संकलित केली जाईल.

● विद्या समीक्षा केंद्राच्या डॅशबोर्डमध्ये उपलब्ध विविध प्रकारच्या माहितीचा अहवाल तयार होईल.

● माहितीचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य / योजना) यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिला जाईल.

● विद्या समीक्षा केंद्रामार्फत संकलित केली जाणारी माहिती अन्य संस्थांकडून Chatbot/App/Platform/Links द्वारा संकलित केली जाणार नाही वा त्याची द्विरुक्ती होणार नाही याबाबतची दक्षता राज्य व जिल्हा स्तरावर घेण्यात येईल.

● ज्या संस्था विद्या समीक्षा केंद्राच्या माहिती व्यतिरिक्त शिक्षण विभागाशी संबधित इतर माहिती संकलित करीत असतील त्यांनी प्रस्तुत माहिती ही विद्या समीक्षा केंद्राच्या सर्व्हरवर संकलित करणे बंधनकारक राहील.

● विद्या समीक्षा केंद्रामार्फत संकलित माहिती शाळांकडून अहवाल स्वरुपात कोणत्याही स्तरावरून मागविली जाणार नाही. जेणेकरून शिक्षकांच्या कामकाजात वाढ होणार नाही.

💁 विद्या समीक्षा केंद्राची प्रत्यक्ष अंमलबजावणी :-

● स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ.१ ली ते इ.१० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. या बाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त (शिक्षण) यांचेद्वारा निर्गमित करण्यात येतील.

● दिक्षा, निष्ठा, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य संपादणूक सर्वेक्षण (SLAS) PGI, पी.एम. पोषण, यु-डायस व Periodic Assesment Test (PAT) यांचे डॅशबोर्ड संबंधित विभागांकडून प्रसारित करण्यात येत आहेत.

● विद्यार्थ्यांच्या सरावासाठी ऑनलाईन पद्धतीने इ. २ री व ३ री साठी भाषा व गणित या विषयाचा तर इ.४ थी ते ८ वी साठी भाषा, गणित व विज्ञान या विषयांचा अध्ययन निष्पत्ती निहाय साप्ताहिक स्वाध्याय सुरु करण्यात येत आहे.

● टप्याटप्याने इतर उपक्रम सुरु करण्याविषयीच्या सूचना संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेद्वारा स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या