Breaking News

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत..

 दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२४ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.


  राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जारत व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.

   मराठी भाषेचा प्रचार व प्रसार" या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात, त्यानुसार यावर्षी देखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यासाठी सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.


💁 राज्यातील सर्व कार्यालयांनी करावयाचे कार्यक्रम :-

■ मराठी भाषेसंबंधी, वाङ्मयासंबंधी विविध परिसंवाद / व्याख्याने / कार्यशाळा / शिबीरे/ कविसंमेलने/ एकांकिका/ बालनाट्ये/ नाटके/ पुस्तक प्रकाशन समारंभ / साहित्य पुरस्कार वितरण यांचे आयोजन करणे.

■ मराठी भाषेत निबंध / प्रश्नमंजुषा/ कथाकथन/ चारोळीलेखन/ कथालेखन/ कवितालेखन/ हस्ताक्षर/ शुद्धलेखन/ वक्तृत्व / घोषवाक्ये/ अभिवाचन/ वादविवाद / अंताक्षरी/ शब्दकोडी/ मराठी साहित्यासंबंधी पुस्तकांचे रसग्रहण / समीक्षण / परिच्छेद अनुवाद इत्यादी स्पर्धा घेणे.

■ मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करुन देण्यासाठी मराठी भाषेतील तज्ज्ञ नामवंत व्यक्ती/ लेखक/ वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करणे.

■ ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन, माहितीपट इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम करणे.

■ वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा सत्कार, मुलाखती घेणे.

■ राज्यातील अमराठी भाषकांना मराठी भाषेचा सुलभ पध्दतीने परिचय करून देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा/ भाषेसंबंधी स्पर्धाचे आयोजन करणे,

■ मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, एफ. एम. रेडिओ, स्थानिक नेटवर्क, फेसबुक, द्विटर, व्हाट्स अँप इ. अशा आधुनिक प्रसार माध्यमातून याबाबतचे संदेश प्रसारित करावेत.

■ मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व विकास यासाठी विविध मार्गानी स्वयंप्रेरणेने काम व्यक्ती/ संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव / सत्कार करणं

■ टंकलेखनाकरिता युनिकोड मराठीचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी अधिकारा व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे.

■ मराठी भाषेचा प्रचार, प्रसार या उद्दिष्टांसह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खालील विषयावरील तसेच अशा स्वरुपाच्या अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

१. अनुवादलेखन 

२. व्यावसायिक लेखन 

३. पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया

४. स्व-प्रकाशन 

५. ई-बुक 

६. ऑनलाईन पुस्तक विक्री

७. लेखक प्रकाशन करार 

८. संहिता लेखन 

९. विकिपिडिया कार्यशाळा

१०. शॉर्ट फिल्म/डॉक्युमेंटरी लेखन

■ डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, तसेच मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी मराठीतील साहित्य स्वयंस्फूर्तीने वाचणे, तसेच पुस्तके विकत घेणे, इतरांना भेट देणे इत्यादी उपक्रम राबवावेत.

■ प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाची जत्रा आयोजित करण्यात यावी. या जत्रेत लोक आपली पुस्तके निःशुल्क किंवा स्वस्त दरामध्ये इतरांना देऊ शकतील, तसेच, या जत्रेदरम्यान मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

■ महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज १००% मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर, त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मराठी भाषा समितीमार्फत विविध उपक्रम राबवावेत तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, नियम, अधिनियम संबंधितांच्या निदर्शनास आणावेत.

■ सर्व संस्थांनी समाज माध्यमांवर "मराठी वाचन कट्टा निर्मिती करावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या